एमआयएमचे गोंधळी नगरसेवक हर्सूल कारागृहात

by - 15:42

एमआयएमचे गोंधळी नगरसेवक हर्सूल कारागृहात

औरंगाबाद / प्रतिनिधी.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या दोन नगरसेवकांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली..दोघांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. विशेष सरकारी वकील रवींद्र अवसरमोल आणि किशोर जाधव यांनी त्याला विरोध केला. दोघांविरुद्ध यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. तपास कामात अडथळा निर्माण करू शकतात. त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने दोघांचेही जामीन अर्ज नामंजूर केले..

गोंधळानंतर नगरसेवक अंडरग्राऊंड.

गेल्यावर्षी १६ ऑक्टोबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यात शहरातील पाणीप्रश्नावर चर्चा सुरू होती. त्यावेळी बायजीपुरा वॉर्ड क्र. ६० चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊनहॉल वॉर्ड क्र. २० चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घातला. महापौरांचा राजदंड सभागृहाबाहेर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अधिकारी बापू जाधव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नगरसेवकांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांना दोघांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि खुर्ची फेकून मारल्याची तक्रार सिटी चौक पोलीस ठाण्यात देण्यात आली. दोघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. घटनेपासून दोघेही फरार होते..






You May Also Like

0 Comments