अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे? |What is the right place for minorities and what is their right to do?

by - 19:43

अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे? 

या देशातील अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान कोणते आहे व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे? याचा नीट विचार करायला हवा. ही गोष्ट खरी आहे की तोंडी काहीही म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये, एक सांस्कृतिक समुदायाच्या नात्याने अल्पसंख्याकांचा कसलाही वाटा नाही. मग काय, केवळ बहुसंख्याकांचे हल्ले थोपविणे आणि शासन-व्यवस्थेत काही हिस्सा मिळविण्यात आपली सर्व शक्ती खर्ची घालणे, इतकेच तुमचे कर्तव्य आहे? मग देश कोठेही जावो, तुम्ही संख्येने कमी आहात, म्हणून दुर्बल आहात, असा तुमचा समज आहे, परंतु निर्णायक शक्ती ही संख्येचा कमी-अधिकपणा नसून, ती मानवतेच्या गुणांवर असते. संख्या कमी असणे हा अपराध नसून, जगाला देण्यासाठी तुम्हापाशी कोणतीही देणगी नाही, हा वास्तविक अपराध आहे. 

तुम्हापाशी उन्नत व सच्चरित्र समाज निर्माण करण्याचे सिध्दान्त आहेत आणि आपली तत्त्वे पटविण्यासाठी व आदराचे स्थान मिळविण्यासाठी आवश्यक असणारे नैतिक बल आहे, तर संख्येने तुम्ही कमी असलात तरी पर्वा नाही. कोणत्याही मानवसमुहास वजन व प्रतिष्ठा निर्माण करणारी बाब त्यांची संख्या नसते, तर त्यांच्या जीवनाचे सिध्दान्त व उच्च नैतिक चारित्र्याचे विभूषण मानव-समुदायात वजन व प्रतिष्ठा निर्माण करते. खेदाची गोष्ट अशी आहे की तिकडे तुमची नजर वळत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की तुमचे दृष्टिकोन व तुमचे व्यवहार यांना आपल्या सांस्कृतिक वर्तुळात वेढून घेतले आहे. फार तर अनेक अल्पसंख्याकांशी संघटन करुन संयुक्त आघाडी उभारण्यापलीकडे तुम्ही जात नाही. हे सर्व उपाय स्वरक्षणाचे आहेत. 

हे उपाय यशस्वी जरी झाले, तर तुम्ही थोडक्यात अधिक शक्तीनिशी संघर्ष करु शकाल अथवा राजकारणात काही तात्कालिक लाभ मिळवू शकाल, यापेक्षा अधिक काही लाभ होणार नाही. हे नकारात्मक धोरण आहे. एखाद्या संकटाच्या भयाच्या भावनेने जे लोक एकत्र येतात, ते अधिक काळापर्यंत एकत्रित राहू शकत नाहीत. संकट नाहीसे झाले की ते विघटित होऊन विखुरले जातात. तुम्हापाशी जर सामाजिक सिध्दान्त काही सकारात्मक उद्देश व आकर्षून घेण्याची शक्ती नसेल, तर केवळ राजकारणाच्या लाभासाठी एकत्रित येणारे अल्पसंख्याकांचे समूह आपापसात डोकेफोड करुन एक वेगळाच उपद्रव निर्माण करण्यास कारणीभूत होतील. एखाद्या अल्पसंख्य समूहाला जर आदराचे स्थान प्राप्त करायचे असेल, तर त्याला एकच उपाय आहे. त्याने देशापुढे असे तत्त्व मांडावे, ज्यामुळे देशातील सद्यस्थितीतील विघटनवादावर व दुरावस्थेवर उपाय सिध्द होईल आणि त्यांनी स्वतःमध्ये अशी गुणवैशिष्ट्ये निर्माण करावीत ज्यांचा स्वीकार करण्यास जातीयवादी व्यक्तीही बाध्य होईल. 

इस्लामी राजकीय तत्व प्रणाली

You May Also Like

0 Comments