भोकरदन शहरसह तालुक्यात गारपीट; रब्बी पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल
भोकरदन शहरसह तालुक्यात गारपीट; रब्बी पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल
भोकरदन दस्तक प्रतिनिधी
भोकरदन : भोकरदन शहरसह संपूर्ण तालुक्यात गुरुवारी ( दि. १८ ) दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा पाऊस झाला. अचानक झालेल्या गारपीटीमुळे शहरासह, ग्रामीण भागात व शेतात सर्वत्र गारांचा खच साचला आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा सिड्स, हरबरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील भोकरदन, इब्राईमपूर, मुठाड, आव्हाना, गोकुळ, पेरजापुर, नांजा, सुभानपूर, आलापूर, मलकापूर, वाडी बु, वाडी खु, फत्तेपुर, मानापूर, विरेगाव या परिसरात गुरुवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला.
सकाळपासून कडक ऊन जाणवत होते. मात्र, दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर लगोलग 2:30 वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्यासह बोराच्या आकाराच्या गाराचा वर्षाव सुरू झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट व पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
वादळामुळे शहरासह अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाली होती अनेक ठिकाणी जोरदार पाउस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले या परिसरातील संपूर्ण शेती पांढरीशुभ्र झाली. सर्वत्र गारांचे ढीग लागले होते. त्यामुळे हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील गहू, कांदा सिड्स, हरबरा, भुईमूग,मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पिकाचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
#भोकरदन तालुक्यात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस होऊन भोकरदन तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त रब्बी पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी नूर सोशल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मा महेबूब भारती यांनी राज्य सरकार कडे केली आहे.

0 Comments